Loading Bible Translation
First-time download in progress. This may take a few seconds…
Marathi Holy Bible Wordproject Bible
33 verses
1परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला,
2“इस्राएल लोकांना सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय.
3त्याचा स्त्राव वाहात असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.
4“स्त्राव होणारा माणूस ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.
5जो कोणी त्याच्या बिछान्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
6स्त्राव होणारा माणूस बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यत अशुद्ध राहावे.
7स्त्राव होणाऱ्या माणसाच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
8“स्त्राव होणारा माणूस जर एखाद्या शुद्ध माणसावर थुंकला तर त्या शुद्ध माणसाने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
9स्त्राव होणारा माणूस ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.
10त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
11“स्त्राव होणारा माणूस पाण्याने हात न धुता कोणाला शिवला तर त्या दुसऱ्या माणसाने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
12“परंतु स्त्राव होणारा माणूस एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
13“स्त्राव होणारा माणूस आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
14आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.
15मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या माणसाच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.
16“एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्य���ने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
17ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे.
18स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
19“एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तीने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे;
20ती दूर असे पर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय.
21जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
22ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
23तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
24“अशा स्त्रीबरोबर लेंगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.
25“एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्त्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋ तुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय.
26तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात समजते. तशी अशुद्ध समजावी.
27जर कोणी त्या वस्तूंना शिवेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
28त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल.
29मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.
30मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.
31“ह्या प्रकारे तुम्ही इस्राएल लोकांना अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल!”
32स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो;
33आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करुन अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.