Loading Bible Translation
First-time download in progress. This may take a few seconds…
Marathi Holy Bible Wordproject Bible
18 verses
1ज्ञानरुपी स्त्रीने आपले घर बांधले, त्यात तिने सात खांबठेवले.
2तिने (ज्ञानरुपी स्त्रीने) मांस शिजवले आणि द्राक्षारस तयार केला. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले.
3नंतर तिने आपल्या नोकरांकरवी शहरातील लोकांना तिच्याबरोबर टेकडीवर भोजन करण्यासाठी येण्याचे आमंत्रण पाठविले. ती म्हणाली,
4“ज्या लोकांना शिकण्याची आवश्यकता वाटते त्यांनी यावे.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले. ती म्हणाली,
5“या माझ्या ज्ञानाचे अन्न खा. आणि मी तयार केलेला द्राक्षारस प्या.
6तुमचे जुने, मूर्खपणाचे मार्ग सोडून द्या. मग तुम्हाला आयुष्य मिळेल. समजूतदारपणाचा मार्ग अनुसरा.”
7जर तुम्ही गर्विष्ठ माणसाला तो चुकत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यावर केवळ टीका करेल. तो माणूस देवाच्या शहाणपणाची चेष्टा करतो. जर तुम्ही दुष्ट माणसाला तो चुकत आहे असे सांगितले तर तो तुमची चेष्टा करेल.
8म्हणून जर एखादा माणूस तो इतरांपेक्षा चांगला आहे असे म्हणत असेल तर त्याला तो चुकतो आहे असे सांगू नका. तो त्या बद्दल तुमचा तिरस्कार करेल. पण जर तुम्ही शहाण्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा आदर करेल.
9जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शहाणा होईल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शिकेल.
10परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवणाची पहिली पायरी आहे.
11जर तुम्ही शहाणे असाल तर तुमचे आयुष्य अधिक वाढेल.
12जर तुम्ही शहाणे होत असाल तर तुमच्या भल्यासाठीच शहाणे होत असता. पण तर तुम्ही गर्विष्ठ झालात आणि दुसऱ्या लोकांची चेष्टा करु लागलात तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांबद्दल तुम्हीच जबाबदार ठरता.
13मूर्ख माणूस हा कर्कश बोलणाऱ्या वाईट स्त्रीसारखा असतो. तिच्याजवळ ज्ञान नसते.
14ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते. ती शहारातल्या टेकडीवर तिच्या खुर्चीवर बसते.
15आणि जेव्हा लोक निघून जातात तेव्हा ती त्यांना बोलावते. त्या लोकांना तिच्यात काही रस नसतो. तरीही ती म्हणते,
16“या ज्या लोकांना शिकणे आवश्यक आहे त्यांनी या.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले.
17पण ती (मू���्खता) म्हणते, “जर तुम्ही पाणी चोरले तर ते पाणी तुमच्या पाण्यापेक्षा अधिक चवदार लागते. जर तुम्ही भाकर चोरली तर ती तुम्ही केलेल्या भाकरीपेक्षा अधिक चवदार लागते.”
18आणि त्या मूर्ख गरीब लोकांना हे माहीत नव्हते की तिचे घर फक्त भूतांनी भरलेले आहे. तिने (मूर्खता) त्यांना मृत्युलोकातल्या अगदी खोल भागात बोलावले होते.